महत्वाचे

सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यावरून मंत्री नितेश राणे अडचणीत, राज्य अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवणार

मंत्री नितेश राणे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निषेध नोंदवला आहे.

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंचीच दुकाने लागावीत आणि इतर धर्मीयांना जागा देऊ नये, असे वादग्रस्त विधान करणारे राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून लवकरच नोटीस बजावली जाणार आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा दावा करीत, राणेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’ : प्यारे खान यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “नितेश राणे सतत वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राला बरबाद करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाला व राज्याला एकतेचा संदेश देत असताना राणे वातावरण कलुषित करीत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा राहावा यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत, पण राणे यांच्या विधानामुळे तेढ निर्माण होत आहे.”

ते पुढे म्हणाले, “या प्रकरणी मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त नेत्यांना बाजूला केलं आहे. त्याच यादीत नितेश राणेंचं नाव लवकरच दिसेल. अल्पसंख्याक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवली जाईल”, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

नेमका वाद काय? : गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असताना मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्यातील दुकानांसंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा उत्सव आहे. त्यामुळे सर्वत्र केवळ हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत. गोल टोपी आणि दाढीवाले येथे कशाला हवेत? दुकानाबाहेर नावं बदलून आत भलतीच व्यक्ती बसलेली असता कामा नये. त्र्यंबकेश्वर परिसरात इतर धर्मीयांची दुकानं दिसतात, त्यांचं तिथं काय काम? आम्ही त्यांच्या प्रार्थनास्थळाजवळ विकायला जातो का?” असं विधान करीत त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदू समाज, साधू-संतांनी सतर्क राहावं, असे आवाहन केलं. नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्षेप नोंदवला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.