शेतकऱ्यांसाठी दिलासा! अचलपूरमध्ये शासकीय मका खरेदी प्रक्रियेला सुरुवात

अचलपूर (प्रतिनिधी) : अचलपूर खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात शासकीय मका खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मका खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या वर्षीच्या मका हंगामात बाजारभावापेक्षा हमीभावाने मका विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांकासह थेट अचलपूर खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असून, केवळ मका उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार स्लॉट बुकिंगच्या आधारे मका खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभुदास ठाकरे, उपाध्यक्ष जसवंत तरवले, सचिव नंदा चरोडे, संचालक मंडळ व व्यवस्थापक संतोष चित्रकार यांनी केले आहे.

