महत्वाचे

हुन्नर गुरुकुलला अक्षर मानव पदाधिकाऱ्यांची भेट; कौशल्याधारित शिक्षणाचा अनोखा उपक्रम राज्यभरात चर्चेत

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : युवकांना व्यवहारिक प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी, कौशल्यसमृद्ध बनवून आदर्श समाजनिर्मितीचा मार्ग दाखवणाऱ्या हुन्नर गुरुकुल या आगळ्या-वेगळ्या संस्थेला अक्षर मानवचे विश्वस्त व सुप्रसिद्ध मराठी कथालेखक-कादंबरीकार राजन खान, लेखिका संगीता हरी नरके, अक्षर मानव महाराष्ट्र राज्याचे संघटक आझाद जमा खान आणि सुजित चव्हाण यांनी भेट देत सखोल माहिती घेतली. संस्थेची कार्यपद्धती पाहून अक्षर मानवने ही संस्था कायमची जोडून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गराडे (ता. सासवड, जि. पुणे) येथे असलेले हे गुरुकुल निसर्गरम्य परिसरात उभे असून इमारतींचा साधेपणा, उपयुक्तता आणि कलात्मक रचना विशेष लक्ष वेधून घेतात. “मन-मेंदू शांत करणारे, साधेपणातले सौंदर्य दाखवणारे हे ठिकाण म्हणजे ‘आत्मबैठकीची’ अनुभूती देणारे स्थान आहे,” अशी भावना लेखक राजन खान यांनी व्यक्त केली.

प्रवेश फीशिवाय वर्षभराचे निवासी प्रशिक्षण

संस्था १७ ते २५ वयोगटातील युवकांना कोणतीही प्रवेश फी न घेता बांधकाम, सुतारकाम, बांबूकाम अशा पर्यावरणपूरक कारागिरीचे वर्षभर प्रशिक्षण देते.
झाली भिंत, अडोबी, कॉब, वॅटल अँड डॉब, रॅम्ड अर्थ, माती-चुना-सिमेंट फिनिशेस यांसारख्या भारतीय बांधकाम पद्धती येथे प्रत्यक्ष शिकवल्या जातात.

प्रशिक्षणादरम्यान राहणे-जेवणाची उत्तम व्यवस्था पूर्णपणे मोफत उपलब्ध असून, “फक्त शिक्षणाबद्दल गंभीरता असणाऱ्या मुलांनाच प्रवेश दिला जातो,” असे संस्थेने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे सहज प्रवेश मिळू शकतो.

स्वतःच्या पायावर उभे करणारे कौशल्य

प्रशिक्षणानंतर मुलांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. “येथे माणूस घडतो… कारागिरीसोबतच कष्ट, शिस्त आणि संवेदनशीलता रुजवण्याचे काम इथे होते,” असे मत लेखक राजन खान यांनी व्यक्त केले.

अक्षर मानवची राज्यभर मोहिम

अक्षर मानवचे राज्य संघटक आझाद जमा खान म्हणाले,
“ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा होतकरू मुलांसाठी ही संस्था वरदान आहे. राज्यभरातील अशा मुलांना शोधून आम्ही या गुरुकुलात प्रवेश मिळवून देत आहोत.”

प्रवेशासाठी संपर्क

अक्षर मानवचे तिवसा येथील विभागीय कार्यालयातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.
संपर्क : अक्षर मानव कार्यालय, नवीन कोर्टसमोर, तिवसा, ता. तिवसा, जि. अमरावती
मो. 9766096906
— अशी माहिती जिल्हा सचिव अश्विनी वितोंडे-खान यांनी दिली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.