अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक : नामांकनांच्या तुफानाने रंगले राजकीय रणांगण

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : नगरपरिषद निवडणूक २०२५ साठीचा नामांकनाचा शेवटचा दिवस शनिवारी अंजनगाव सुर्जीमध्ये अक्षरशः राजकीय उन्मादाचे दृश्य रंगवून गेला. उमेदवारांची गर्दी, कार्यकर्त्यांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि पक्षांचे शक्तिप्रदर्शन यामुळे निवडणूक प्रक्रिया उत्साहाच्या उच्चांकी बिंदूवर पोहोचली.शेवटच्या दिवशी झालेल्या अर्जांच्या वर्षावामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी १०, तर आतापर्यंत मिळून तब्बल १४ नामांकनांची नोंद झाली आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल ११७ अर्ज, तर एकूण ३०८ नामांकन अर्ज दाखल होऊन निवडणूक खऱ्या अर्थाने बहुरंगी होत असल्याचे चित्र दिसले.
-नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांची यादी
1. आकाश सहदेव राऊत
2. कांचनमाला शिवकिरण वानखेडे
3. तारा गुणवंत सरकटे
4. डॉ. स्पृहा अतुल डकरे
5. विनीत डिगांबर डोंगरदिवे
6. विनोद किसनराव दुर्गे
7. सुनील रुपराव जवंजाळ
8. आयशा बानो रशिद खा
9. सुरेश मारोतीराव खेरडे
या नऊ नावांसह नगराध्यक्ष पदाचा मुकाबला अधिक चुरशीचा होणार, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
-प्रक्रिया पारदर्शक, वातावरण उत्साहपूर्ण
नामांकन स्वीकृतीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे, तसेच सहायक अधिकारी विजय लोहकरे आणि पुष्पा डाबेराव यांनी दिवसभर काटेकोरपणे पार पाडली. सततची गर्दी, अर्जांचा ओघ आणि उमेदवारांच्या रॅल्या असूनही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहिली.
तर दुसरीकडे, संपूर्ण शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांचे पथक दिवसभर दक्षतेने तैनात राहून कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याची काळजी घेत होती.
-राजकीय वातावरण तापले
नामांकनांच्या तुफानी प्रतिसादामुळे अंजनगाव सुर्जीची निवडणूक सरळ-साधी न राहता, रंगतदार, उत्साही आणि चुरशीची होणार असल्याचे संकेत पहिल्याच दिवसापासून मिळू लागले आहेत. निवडणूक चित्र आता स्पष्ट होत असताना मतदारांच्या अपेक्षा, चर्चासत्रे आणि राजकीय समीकरणांनाही उधाण आले आहे.

