महाराष्ट्र

मेळघाटाच्या आरोग्यसेवेला ‘गुणवत्तेची नवी दिशा’ — सीईओ संजीता महापात्रांचा सखोल दौरा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी आज मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देत आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. दुर्गम भागातील मूलभूत आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची  तपासणी केली.

धारणी उपजिल्हा रुग्णालयातील मातृ व बाल आरोग्य विभाग, स्वच्छता, औषधसाठा, उपचार सुविधा आणि रुग्णकल्याण व्यवस्थेचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. अधिक गुणवत्तापूर्ण आणि तातडीच्या सेवा नागरिकांना मिळाव्यात यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर आयोजित बैठकीत वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या सोबत आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दुर्गम व आदिवासी भागात तातडीच्या आरोग्यसेवा उपलब्धतेस प्राधान्य देणे, कुपोषण निर्मूलनासाठी आंतरविभागीय समन्वय मजबूत करणे आणि मातृ-बाल आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष्यित उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रालाही सीईओ महापात्र यांनी भेट देऊन महिला-बालकल्याण, पोषण कार्यक्रम आणि स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा सविस्तर अभ्यास केला. प्रलंबित विषयांची माहिती घेऊन त्यांनी तात्काळ आवश्यक त्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.