अंजनगाव सुर्जीमध्ये महसुलाचा उसळता प्रवाह; निवडणूक माहोलात तब्बल २५ लाखांची भर

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकांचा जल्लोषमय माहोल सुरू होताच शहरातील करदात्यांनीही उत्साहाचा अक्षरशः वर्षाव केला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून केवळ काही दिवसांत नगरपरिषदेकडे तब्बल २५ लाख ३७ हजार २७८ रुपये इतका महसूल जमा झाला असून, हा प्रतिसाद प्रशासनासाठी अनपेक्षित आनंदाचा शिडकावा ठरला आहे.
सामान्यतः सहा महिन्यांत घराघरांत जाऊन केलेल्या कर-वसुलीत जितका महसूल जमा होतो, तितकीच रक्कम या अल्पावधीत कोषात ओघळल्याने नगरपरिषदेला अभूतपूर्व आर्थिक बळ मिळाले आहे. वाढीव महसुलाचा हा प्रवाह आता चालू कामकाजाला गती देणारच, शिवाय प्रलंबित विकासकामांना नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा नगरपरिषद प्रशासनातून व्यक्त होत आहे.
करदात्यांनी दाखविलेल्या या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल प्रशासनाने मन:पूर्वक आभार मानत, “हीच साथ पुढील काळातही कायम राहो,” असे आवाहन केले आहे. अंजनगाव सुर्जीच्या विकासयात्रेला नवी ऊर्जा देणारा हा महसुलाचा उसळता प्रवाह आता संपूर्ण शहराच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरू लागला आहे.

