ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

भाजपत उमेदवारांची ‘आयात’ मेळघाटात निष्ठावंत नाराज

मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी धारणीत; झेडपी सर्कल एसटीसाठी राखीव

अमरावती : मेळघाटात धारणी आणि चिखलदरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने नाट्यमय घडामोडी करून इतर पक्षातून ‘आयात’ केलेल्यांना उमेदवारी बहाल केल्याने निष्ठावंतामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, २५ नोव्हेंबरला धारणी येथे जाहीर सभेकरिता येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपातील ही नाराजी शमविली जाते काय? याकडे नजरा लागल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने गत काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या आरक्षणानुसार धारणी, चिखलदरा तालुक्यातील ९ जिल्हापरिषद सर्कल हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे मेळघाटात आदिवासींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संवर्गातील व्यक्तीला जिल्हा परिषदेची निवडणूक लढता येणार नाही, हे अधोरेखीत झाले आहे. तर २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या धारणी, चिखलदरा नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडणुकीसाठी भाजपात अनेक जण इच्छुक होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून भाजप पक्षात सक्रिय राहून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार, प्रसार केला. काही निष्ठावंत तर संघ परिवाराशी निगडित आहे. यंदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल असा पक्का विश्वास इच्छुकांना होता. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी स्थानिकस्तरावर कोणालाही विश्वासात न घेता धारणी आणि चिखलदरा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी ‘आयात’ उमेदवार लादल्याची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे निवडणूक काळात भाजपचे निष्ठावंत कोणती भूमिका वठवतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. हे ३ डिसेंबर रोजीच्या निकालानंतर स्टष्ट होईल.

 

नगराध्यक्ष पदावरुन नाराजीचा सूर

ज्यांचा भाजपशी काडीमात्र संबंध नाही, अशांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असा सूर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागला आहे.

आमदारकीनंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे तेच झाले ?

मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार केवलराम काळे हे आहेत. ते विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले होते. पडद्याआडील राजकीय घडामोडींनी त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि काळे निवडून आले. काळे यांचा अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, माजी आमदार तथा मेळघाटचे भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर हे त्यावेळी मेळघाटात आमदारकीसाठी प्रमुख दावेदार होते, पण भाजप श्रेष्ठींनी त्यांना ‘वेट अॅन्ड वॉच’चा सल्ला दिला होता, हे विशेष.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारणी येथे सभा

धारणी, चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धारणी येथे येत आहेत.

प्रशासनाने तयारी चालविली असून धारणी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा व कनिष्ठ विद्यालयाच्या प्रागंणात हेलिपॅड बनविले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे धारणी येथे हेलिकॉप्टरने येणार असून प्रचारसभेला संबोधित करतील, अशी माहिती आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची ही पहिलीच सभा ठरणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मेळघाट हॉट ठरत आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ चिखलदऱ्यात आल्हाद कलोती हे अविरोध निवडून आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.