“आकाश राऊतांच्या न्यायलढ्येला उच्च न्यायालयाची साथ; अंजनगाव सुर्जीत निवडणूक स्थगित – न्यायाच्या मार्गावर ठाम, वैरभावाला नकार”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : नगराध्यक्षपदाच्या रणधुमाळीत कायदेशीर वादाच्या छायेत अडकलेली अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक अखेर स्थगित झाली असून, ही घडामोड संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे. वंचित बहुजन पक्षाचे तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आकाश सहादेव राऊत यांच्या अर्जातील त्रुटींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या. या हरकतींना आव्हान देत राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अमरावती खंडपीठात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने दिलेल्या तडकाफडकी आणि महत्त्वपूर्ण निकालात आकाश राऊत यांच्या बाजूने निर्णय देत, निवडणूक प्रक्रियेला थांबा लागला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सामान्य नागरिकांमध्येही चर्चेची जोरदार लाट उठली आहे.
न्यायालयीन विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आकाश राऊत म्हणाले,
“माझं कुणाही पक्षातील उमेदवाराशी वैर नाही. ही लढाई वैयक्तिक नाही, ही न्यायासाठीची लढाई आहे. लोकशाहीतील प्रत्येक उमेदवाराला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी माझा संघर्ष होता आणि तो पुढेही असणार आहे.”
त्यांच्या या संयत, परंतु ठाम भूमिकेमुळे राजकीय तापलेल्या वातावरणात एक वेगळीच दिशा निर्माण झाल्याचे जाणवत आहे. न्यायालयाच्या निर्णयाने निवडणूक प्रक्रियेला अनपेक्षित वळण मिळाले असले, तरी लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करणारा हा क्षण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अंजनगाव सुर्जीच्या राजकीय इतिहासात हा प्रसंग एक महत्त्वपूर्ण वळण ठरेल, यात शंका नाही.
न्यायाच्या मार्गावर ठाम राहणाऱ्या आकाश राऊत यांच्या भूमिकेची चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे.

