ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

बेलोरा येथील दत्त मंदिराला साडेपाचशे वर्षांचा इतिहास; राजस्थानी नक्षीकाम अन् एकात्मतेची आहे परंपरा

अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावात सुमारे साडेपाचशे वर्ष जुनं असलेलं मंदिर आहे. दत्त जयंतीनिमित्त या मंदिराचा इतिहास जाणून घ्या.

अमरावती : जिल्ह्यातील चंदूर बाजार तालुक्यात बेलोरा गावात सुमारे पाचशे ते साडेपाचशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं श्री दत्त मंदिर हे गावाचं आध्यात्मिक केंद्र मानलं जातं. श्री दत्तात्रय यांच्यासोबतच महर्षि अत्रि, माता अनुसया यांच्या प्राचीन मूर्तिंचं या मंदिरात दर्शन घडतं. दत्तजयंतीच्या कार्यक्रमात संपूर्ण गाव उत्साहानं सहभागी झालेलं आहे.

पेढी नदीत सापडल्या मूर्ती : “श्री दत्त मंदिरात पांढऱ्या रंगाच्या पाषाणात सगळ्यात मोठी मूर्ती ही महर्षि अत्रि यांची आहे. तर त्यांच्या बाजूला माता अनुसया आणि श्री दत्ताची छोटी मूर्ती आहे. सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी पेढी नदीच्या पात्रात या मूर्ती मिळाल्या होत्या. यानंतर त्यांची स्थापना बेलोरा गावाच्या वेशीवर करण्यात आली. त्यावेळी याठिकाणी मंदिर उभारण्यात आलं,” अशी माहिती मंदिर संस्थाचे अध्यक्ष अशोक देशमुख यांनी ‘खरा संवाद’ शी बोलताना दिली.

 

असं आहे मूर्तिचं वैशिष्ट : श्री दत्त, महर्षि अत्रि आणि माता अनुसया या तिन्ही मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. डोळे, नाक, ओठ असे मूर्तींच्या चेहऱ्यावरचं अवयव अतिशय सोप्या ग्रामीण शिल्पकला पद्धतीत साकारलेले दिसतात.

 

त्रिमूर्ती मंडप व्यवस्था : “पुराणातील कथेनुसार दत्तात्रय यांचा जन्म सप्त महर्षींमध्ये गणल्या जाणाऱ्या महर्षि अत्रि आणि माता अनुसया यांच्या घरी झाला. दत्तात्रय, चंद्रमावळेश्वर आणि दुर्वासा ऋषी अशी तीन रूपे प्रकटली, असा उल्लेख पुरणात आहे. बेलोरा गावात महर्षि अत्रि आणि माता अनुसया हे दोघंही दत्तात्रयांच्या मूर्तीसह एकाच मंदिरात विराजमान आहेत. विशेष म्हणजे दत्त मंदिरात दत्तात्रयांसोबत त्यांच्या माता-पित्यांची मूर्ति फार क्वचित ठिकाणी आढळतात. बेलोरा येथील मंदिरात मात्र त्रिमूर्ती मंडप व्यवस्थेत महर्षि अत्री, माता अनुसया आणि श्री दत्तात्रय यांच्या मूर्ति असणं म्हणजे या ठिकाणाला फार महत्त्व आहे असं मानलं जातं,” अशी माहिती अशोक देशमुख यांनी दिली.

 

मंदिराचा झाला जीर्णोद्धार : “सुमारे दोनशे वर्षांपूर्वी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या द्रौपदाबाई देशमुख यांच्या सासूबाई गंगाबाई देशमुख यांनी यांनी या मंदिराला तीनशे एकर शेत दान दिलं. या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्या मंदिराजवळ असणाऱ्या तीस एकर जमिनीतून मिळणारं उत्पन्न आणि ग्रामस्थांच्या वर्गणीतून मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात,” असं अशोक देशमुख म्हणाले.

 

राजस्थानी शैलीत मंदिराची रचना: “श्री दत्त मंदिर दुरून एखाद्या वाड्यासारखं भासतं. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी राजस्थानचे कारागिर या परिसरात उदरनिर्वाहाचा निमित्तानं आले होते. या कारागिरांनी श्री दत्तचं मंदिर नव्यानं बांधून दिलं. मंदिरातील सर्व खांब आणि सभामंडपावर अतिशय सुबक आणि छान असं नक्षीकाम केलं आहे. मंदिरात येणारा भाविक गाभाऱ्यासह मंदिराच्या सभामंडपात बसला तरी त्याला नवं चैतन्य प्राप्त होतं असं वातावरण मंदिरात आहे”, असं मंदिराचे विश्वस्त गौरव येवले यांनी ‘खरा संवाद’शी बोलताना सांगितलं.

 

दत्ता जयंतीनिमित्त असा असतो सोहळा :

  • संपूर्ण मंदिर रोषणाईनं झळकलं आहे.
  • सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मोत्सव
  • दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता रथ यात्रा
  • तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावात महाप्रसादाचं आयोजन
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.