योग्य वेळेला अचूक निर्णय, निकालानंतर चित्र स्पष्ट होईल; मनपातील युतीबाबत सुनील तटकरे यांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
आगामी पालिका निवडणुकीत युतीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

रायगड – जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका तसंच महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. महायुतीबाबतच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक आणि संयमी भूमिका मांडली.
योग्य वेळेला अचूक निर्णय – पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांनी ‘वेट अँड वॉच’चा सल्ला देत स्पष्ट केलं की, “आधी नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागू द्या, त्यानंतरच पुढील राजकीय गणितं स्पष्ट होतील. महानगरपालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर परिस्थिती कशी वळण घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.” योग्य वेळेला अचूक निर्णय हे राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य असल्याची आठवण करून देत, कोणतीही घाई न करता योग्य क्षणाची वाट पाहण्याचे संकेत तटकरे यांनी दिलेत.
निकाल आमच्या बाजूनं लागणार – दरम्यान, रविवारी जाहीर होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांबाबत बोलताना तटकरे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जिथं युती झाली आहे, त्या नगरपालिकांमध्ये निश्चितपणे यश मिळेल. रायगड जिल्ह्यात निकाल आमच्या बाजूनं ठळकपणे आणि निर्विवाद असतील.” निकाल आमच्यासाठी सकारात्मक ठरेल, असंही तटकरे यांनी ठामपणे सांगितलं.
महायुतीत एकवाक्यता राखली जाईल – महानगरपालिका निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करताना तटकरे म्हणाले, “सामंजस्याच्या वातावरणातून निवडणुका लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः आपण यांच्यात संयुक्त चर्चा झाली असून, निवडणुका लढताना एकवाक्यता कशी राखायची यावर सविस्तर चर्चा झाली.” यासंदर्भात रविंद्र चव्हाण, बावनकुळे, गिरीष महाजन, चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशीही चर्चा केल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
महायुती म्हणून एकत्र – रायगडमधील शिवसेना-राष्ट्रवादीतील तणावाबाबत विचारलं असता तटकरे म्हणाले, “राज्यात महायुती कशी बळकट राहील, या प्रयत्नातील मी एक कार्यकर्ता आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आम्ही सर्व महायुती म्हणून एकत्र आहोत. काही निर्णय घ्यायचे असतील तर वरिष्ठ पातळीवर एकत्र बसून ते घेतले जातील. राष्ट्रवादीकडे सामंजस्यासाठी सहा सदस्यांची समिती असून, संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातूनच पुढील वाटचाल केली जाईल.”

