महाराष्ट्र

ग्रामीण स्त्रीच्या मौनातून उभा राहणारा समाजाचा आरसा — ‘चूक कोणाची?’

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : ग्रामीण स्त्रीच्या अंतर्मनातील घुसमट, जात-वास्तवाची गुंतागुंत आणि गावाच्या सामूहिक जीवनाचे सूक्ष्म पदर उलगडणारी ‘चूक कोणाची?’ ही कादंबरी केवळ कथानकापुरती मर्यादित राहत नाही, तर वर्हाडी भाषेच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे जिवंत दर्शन घडवते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश अकोटकर यांनी केले.
लेखिका, कवयित्री वर्षा पतके थोटे यांच्या ‘चूक कोणाची?’ या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाष्यकार रेखा दंडिये-घिया, लेखिका वर्षा पतके थोटे आणि मनोज थोटे उपस्थित होते.
अकोटकर पुढे म्हणाले की, ग्रामीण बोलीभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती त्या परिसराच्या संस्कृतीची वाहक असते. आजच्या पिढीला अपरिचित ठरत चाललेले अनेक वैदर्भीय शब्द या कादंबरीतून पुन्हा जिवंत होतात. चपखल म्हणी, अस्सल वाक्प्रचार आणि वास्तववादी संवादांमुळे ही कलाकृती वैदर्भीय बोलीभाषेचा महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरते.
कादंबरीवर भाष्य करताना रेखा दंडिये-घिया म्हणाल्या की, जातीच्या भिंती पाडण्याच्या चर्चा होत असतानाच समाजात नव्याने जातीच्या चुली पेटवल्या जात आहेत. पुरुषप्रधान ग्रामीण संस्कृतीतील जातीय वास्तव, स्त्रीवर होणारे दमन आणि त्यातून उलगडणारे सामाजिक प्रश्न या कादंबरीत प्रभावीपणे मांडले आहेत. श्यामला ही नायिका कमकुवत दाखवली असली, तरी ती कमकुवत का आहे, हा मूलभूत प्रश्नच कादंबरी समाजासमोर ठेवते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी कादंबरीच्या रचनेविषयी बोलताना सांगितले की, दीर्घ कथानक पद्धतीतील ही मांडणी प्रवाही असून ग्रामीण प्रतिमांचा डोळस वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नायिकेचे मौनच समाजाला अधिक तीव्रपणे प्रश्न विचारते आणि याच मौनातून लेखिकेची साहित्यिक ताकद अधोरेखित होते.
प्रारंभी लेखिका वर्षा थोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या साहित्यिक सोहळ्यासाठी साहित्य वर्तुळातील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.