केळीच्या खांबातून शाश्वत विज्ञानाची उंच भरारी; अडगावच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरावर धडक

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अमरावती जिल्ह्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ देणारी ५३ वी अमरावती जिल्हा विज्ञान प्रदर्शनी दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत वरुड येथे उत्साहात पार पडली. एनसीईआरटी नवी दिल्ली, भारत सरकार, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद अमरावती शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनीत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक जिज्ञासा सादर केली.
या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, अडगाव (केंद्र भंडारज) येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. अफशा माहीन मोहम्मद जावीद व कु. प्रणाली नितीन गवई यांनी प्राथमिक गटातून उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या “केळीच्या खांबापासून द्रवखत व फायबर निर्मिती” या पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाला हातभार लावणाऱ्या प्रयोगाने परीक्षक व उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या यशस्वी प्रयोगाच्या आधारे विद्यार्थिनींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली असून, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेसाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण विभागातून थेट राज्यस्तरावर पोहोचणारी अडगावची ही पहिलीच जिल्हा परिषद शाळा ठरली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थिनींना मा. प्रिया देशमुख (शिक्षणाधिकारी), श्री. गाडे सर (गट शिक्षणाधिकारी, वरुड) तसेच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षिका कु. कांचन दादाराव भांगे यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले.
यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून अधिकारी, पदाधिकारी व शिक्षणप्रेमींनी विद्यार्थिनींना राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थिनींनी व मार्गदर्शक शिक्षिका कु. भांगे यांनी या यशाचे श्रेय सहकारी शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत अडगाव यांना दिले आहे.

