बारी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा दीप प्रज्वलित : अंजनगाव सुर्जी येथे ४८ गुणवंतांचा गौरव, शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शिक्षणातून समाजप्रगतीचा संदेश देणारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, शिष्यवृत्ती वितरण व मान्यवरांचा सत्कार समारंभ अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अखिल भारतीय बारी कर्मचारी सामाजिक संस्था, संस्कार वाचनालय व संस्कार अभ्यासिका, दयानंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी श्री विठ्ठल मंदिर, खोडगाव नाका येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी देविदास पांडुरंगजी रेखाते (माजी प्राचार्य, इंदिरा गांधी विद्या व कला महाविद्यालय, दहिगाव रेचा) विराजमान होते. उद्घाटन ॲड. कमलकांत लाडोळे व देविदास रा. नेमाडे (माजी नगराध्यक्ष) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून सौ. मायाताई विवेकजी धुळे (नगराध्यक्षा, अकोट) व सुनिल नामदेवराव चिरडे (नगराध्यक्ष, दारव्हा) उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जगन्नाथ पंढरीनाथ धर्मे (नवी दिल्ली), राहुल श्रीरामजी सातपुते (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती) व डॉ. सागर रमेशराव माकोडे यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, सातत्य व मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी आपल्या विचारांतून अधोरेखित केले.
सन २०२४–२०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी व पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बारी समाजातील ४८ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ देण्यात आले.
कार्यक्रमात अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेमधील नवनियुक्त नगरसेवक उमेश तुळशीरामजी भोंडे, प्रवीण देविदासराव नेमाडे, सौ. पूनम सुरज येऊल, सौ. प्रियंका निलेश आवंडकर व रामन्य रवींद्रजी आवंडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासह कु. प्रतीक्षा महादेवराव पोकळे (टीव्ही अभिनेत्री) व श्रीनिवास गणेशराव पोकळे (राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बालकलाकार) यांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांचा सपत्निक सत्कार हा कार्यक्रमाचा भावनिक क्षण ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत किसनराव लाडोळे (यूएसए), सौ. ज्योतीताई रवींद्र माकोडे (प्राचार्य), विनोद मधुकरराव हेंड (सहाय्यक शिक्षक) व कैलास लक्ष्मणराव नाठे (पिंपरी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजनाची धुरा रवींद्र रामभाऊ येऊल, देविदास पांडुरंग रेखाते, विनायक तु. दाभाडे, गजानन गं. येऊल व विजय का. भोंडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी समर्थपणे सांभाळली.
सूत्रसंचलन उत्तमराव मुरकुटे (प्राचार्य, सीताबाई संगई कन्या शाळा) यांनी केले. नागरिकांची मोठी उपस्थिती लाभलेल्या या समारंभाने बारी समाजाच्या शैक्षणिक जडणघडणीला नवी ऊर्जा दिली.

