मुऱ्हा गावातील जगदंबा मंदिरात मध्यरात्री चोरीचा धक्कादायक प्रकार; चांदीचा मुकुट व दानपेटी लंपास

-सचिन इंगळे (प्रतिनिधी ( अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात असलेल्या श्रद्धास्थान जगदंबा माता मंदिर व झिंगराजी महाराज संस्थान येथे मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी देवीच्या गाभाऱ्यातील मौल्यवान चांदीचा मुकुट चोरून नेल्यासोबतच मंदिर परिसरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमही लंपास केल्याचे समोर आले आहे.
रविवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचा अंदाज असून, सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी सेवेकरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. गाभाऱ्यातील मुकुट गायब असल्याचे लक्षात येताच आणि दानपेटी तोडलेली दिसताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती तत्काळ रहिमापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तोंडाला मास्क लावलेले व अंगावर जॅकेट परिधान केलेले दोन संशयित इसम रात्री मंदिर परिसरात फिरताना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे मुऱ्हा गावात भीतीचे वातावरण पसरले असून, भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. देवीच्या दानपेटीतील रक्कम व चांदीचा मुकुट चोरीस गेल्याची बाब प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जगदंबा माता व झिंगराजी महाराज संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पाटील पखान यांनी चोरीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर, अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर, सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे, गजानन वर्मा तसेच अंजनगाव डीबी स्कॉडचे कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष पथकासह अमरावती येथील तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले असून, सर्व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

