महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी अडचणींमुळे हजारो महिलांचे लाभ थांबले; दुरुस्तीची संधी देण्याची प्रशासनाची तयारी

अमरावती (प्रतिनिधी) :राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य बळकट करणे, त्यांच्या आरोग्य व पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणणे आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ई-केवायसी प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः काही पर्यायांच्या चुकीच्या निवडीमुळे अनेक पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज थेट ‘रिजेक्ट’ झाल्याने त्यांच्या आर्थिक सहाय्यावर परिणाम झाला आहे.
योजनेतील लाभ कायम ठेवण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतरही अनेक महिलांना तांत्रिक व प्रक्रियात्मक अडचणी येत असल्याने शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, ऑनलाईन ई-केवायसी दरम्यान दिलेल्या काही पर्यायांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याचे निदर्शनास आले.
विशेषतः विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त, एकल महिला तसेच वडील किंवा पती हयात नसलेल्या महिलांना ई-केवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागला. अर्ज प्रक्रियेत “कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत आहेत का?” किंवा “कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळतो?” या प्रश्नांना चुकीचा ‘नाही’ पर्याय निवडल्यामुळे अनेक अर्जांवर EKYCGovtEmp असा रिमार्क येऊन अर्ज थेट नामंजूर झाले आहेत. परिणामी, या महिलांचे मासिक लाभ थांबले आहेत.
दरम्यान, लाभार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी जिल्हा कार्यालयात गर्दी करण्याची गरज नसून सेतू केंद्र, सायबर कॅफे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा संबंधित तालुकास्तरावरील कार्यालयांमध्येही तपासणी करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा ‘एडिट ऑप्शन’ उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल अधिकारी अतुल भडांगे यांनी दिली. पात्र महिलांचे लाभ अन्यायकारकरीत्या बंद राहू नयेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत केंद्रांमार्फतच माहिती घेण्याचे आणि आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.