महाराष्ट्र

दाभाडीत शब्दांचा महोत्सव : ‘अक्षर मानव’चे नववे राज्यस्तरीय साहित्य संमेलन रंगणार विचार, काव्य आणि संस्कृतीच्या उत्सवात

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : माणसाच्या जगण्यातील विविध आयामांना स्पर्श करणारे कार्य करणारी ‘अक्षर मानव’ ही संस्था केवळ सामाजिक उपक्रमांपुरती मर्यादित नसून विचार, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठीही तेवढ्याच ताकदीने उभी आहे. शब्दांच्या माध्यमातून मनांना जोडण्याच्या या ध्यासातूनच येत्या ६, ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाभाडी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे ‘अक्षर मानव’चे नववे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे नियंत्रक मा. आझाद जामा खान यांनी ही माहिती देताना संमेलनाचे स्वरूप व्यापक आणि आशयघन असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक येथील अक्षर मानवचे संचालक मा. तुषार अहिरे व त्यांच्या समर्पित कार्यसंघाच्या नियोजनातून उभे राहत असलेले हे संमेलन तीन दिवस साहित्य, भाषा, संस्कृती आणि लोकपरंपरेचा जिवंत उत्सव ठरणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रारंभीचे पहिले सत्र होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक-कवी मा. प्रकाश होळकर यांची निवड करण्यात आली आहे. चिखलदरा येथे भरलेल्या पूर्वीच्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कविवर्य प्रा. अशोक थोरात सर यांचीही उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. स्वागताध्यक्षपदाची धुरा दाभाडी येथील टी.आर. हायस्कूलचे प्राचार्य मा. एस.आर. निकम सर सांभाळणार आहेत. प्रमुख विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, कथाकार व कादंबरीकार मा. राजन खान सर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुण्यांमध्ये मुख्याध्यापक मा. आर.एन. मानकर, प्रवचनकार मा. श्री. घनश्याम अहिरे, मा. श्रीमती शुभांगी विक्रम पवार, मा. सौ. अश्विनी दीपक निकम यांचा समावेश आहे. या संमेलनात मराठी भाषेचे भविष्य, पुस्तक प्रदर्शन व विक्री, खानदेशी भाषासाहित्याला विशेष प्राधान्य, खानदेशी परंपरेचे दर्शन, नाट्यप्रयोग, कथाकथन, गावरान खानदेशी बोलीतील कविता, कवी संमेलन, चित्रप्रदर्शन, गोष्टी व लघुकथाकथन स्पर्धा आणि पुरस्कार सोहळे अशा विविध अंगांनी समृद्ध कार्यक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती, वारीची सांस्कृतिक परंपरा, चित्रपट आणि मराठी साहित्य यांवरील चर्चाही रंगणार आहेत.

७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत परिसर सहल आयोजित करण्यात आली असून त्यानंतर विविध सत्रांची मालिका सुरू राहील. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विचारमंथन, संवाद आणि काव्याची मैफल अशा कार्यक्रमांनी दिवस भारलेला असेल. रात्री उशिरा होणारे कवी संमेलन रसिकांसाठी खास आकर्षण ठरेल.

८ फेब्रुवारी हा समारोपाचा दिवस सकाळी नाश्ता व अनौपचारिक गप्पांनी सुरू होऊन पुढील सत्रांतून संमेलनाची सांगता होईल. विशेष म्हणजे या तीन दिवसीय संमेलनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सर्वांना मुक्त प्रवेश आहे. स्वादिष्ट भोजन व राहण्याची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली असून आगाऊ नोंदणी अपेक्षित आहे.

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक म्हणून मा. तुषार अहिरे (संचालक, अक्षर मानव महाराष्ट्र), संगीता फुके (अध्यक्ष, अक्षर मानव नाशिक जिल्हा), राणी मोरे (साहित्य विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र), कल्पना मापुस्कर (कविता विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र), मा. आझाद खान (राज्य नियंत्रक), सुजित चव्हाण (राज्य संघटक), दीपेश मोहिते (उपाध्यक्ष व नियंत्रक साहित्य-कविता विभाग), प्रा. बालाजी सूर्यवंशी (संचालक, कविता व साहित्य विभाग) हे नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.

तसेच सौ. अश्विनी वितोंडे-खान (जिल्हा सचिव, अक्षर मानव अमरावती), यमुना नाखले (संचालक, नागपूर विभाग), मा. श्री. घनश्याम अहिरे, मा. श्रीमती शुभांगी विक्रम पवार, मा. सौ. अश्विनी दीपक निकम, मा. माधुरी तुषार अहिरे, मा. सौ. सरला नितीन निकम, मा. सौ. जयश्री शंकर निकम, मा. श्री. नितीन यशवंत निकम, मा. श्री. अनिल कैलासराव सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे. तुषार निकम, दिनेश नवरे, हर्षल निकम, शरद निकम, मा. श्री. हरीश देवमन निकम, श्री. प्रकाश भिकन ठाकुर, श्री. किरण शिवाजी महिरे आदी सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक प्रमुख संजीवनी राजगुरू यांनीही रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

शब्द, संस्कृती आणि माणुसकी यांची सांगड घालणारा हा साहित्यसोहळा दाभाडीच्या भूमीत विचारांची नवी पेरणी करेल, अशी साहित्यप्रेमींची अपेक्षा आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.