महाराष्ट्र

बेकायदेशीर ‘डबल सायलेंसर’चा शहराला त्रास; अंजनगाव सुर्जीत ध्वनीप्रदूषणाचा भडका, कडक कारवाईची नागरिकांची मागणी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शांत, भक्तिमय आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंजनगाव सुर्जी शहरात अलीकडच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे. विशेषतः काही दुचाकी वाहनांवर बेकायदेशीररीत्या बसवण्यात आलेल्या तथाकथित ‘डबल सायलेंसर’मुळे शहरातील सार्वजनिक शांततेला मोठा धक्का बसत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या सायलेंसरमधून होणारा अतिशय कर्णकर्कश, स्फोटक स्वरूपाचा आवाज केवळ त्रासदायक नसून आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे. सकाळी आणि सायंकाळी शाळा, महाविद्यालये सुरू व सुटण्याच्या वेळेत तसेच बाजारपेठ व रहदारीच्या ठिकाणी काही दुचाकीस्वार जाणीवपूर्वक मोठ्या आवाजात वाहने चालवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
या प्रकाराचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध नागरिक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला बसत आहे. अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक दचकत असून, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या कर्णकर्कश आवाजामुळे विश्रांतीवरही विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांत अशा बेकायदेशीर सायलेंसरच्या वापरात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार सायलेंसरमध्ये फेरफार करणे आणि निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाज करणे हा दंडनीय गुन्हा आहे. मात्र, काही वाहनचालक नियमांना जुमानत नसल्याने कायद्याची पायमल्ली होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
सुज्ञ नागरिकांच्या मते, वेळीच या प्रकारावर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात अपघात, भांडणे किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, बेकायदेशीर सायलेंसर काढून टाकावेत, दोषी वाहनचालकांवर दंडात्मक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी होत आहे.
अंजनगाव सुर्जी शहराची ओळख शांत, सुसंस्कृत व सुरक्षित शहर म्हणून कायम राहावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील सार्वजनिक शांतता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणीची गरज असल्याचे मत सर्व स्तरांतून पुढे येत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.