महाराष्ट्र

मुख्य नाल्याच्या दुर्दशेमुळे अंजनगाव सुर्जीत आरोग्याचा धोका वाढला; तातडीच्या उपाययोजनांची नागरिकांची जोरदार मागणी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव  सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारा प्रमुख मुख्य नाला सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून, साफसफाईच्या अभावामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. नवीन डेपो परिसरापासून गणेशनगर, मातंगपुरा, मोमीनपुरा, डोहरपुरा, बुद्धपुरा, गुलजारपुरा ते जुना बसस्टँड परिसरातून जाणारा हा नाला अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिल्याने त्यामध्ये कचरा, गाळ व सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

नाल्यातील साचलेल्या घाणीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. विशेषतः या नाल्यालगत वस्ती असलेल्या भागांतील रहिवाशांना असह्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेअभावी डास, माश्या, इतर कीटक तसेच सापांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही परिस्थिती केवळ गैरसोयीपुरती मर्यादित नसून, ती थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित गंभीर समस्या बनली आहे. डास व कीटकांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका नाकारता येत नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी ही समस्या अधिक चिंताजनक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषदेकडे लक्ष वेधत मुख्य नाल्याची तात्काळ आणि सखोल साफसफाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमित स्वच्छता, गाळ काढणे आणि कचरा हटविण्याची प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच डास व कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण नाल्यात औषधी फवारणी व कीटकनियंत्रण उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष तसेच संबंधित प्रभागातील नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.