राज्यस्तरीय ‘स्त्रीरत्न’ पुरस्काराने संगीता मेण सन्मानित
छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सोहळा; सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : छत्रपती संभाजीनगर येथे नवचेतना साहित्य व सामाजिक मंच आयोजित ‘सन्मान नारीशक्तीचा’ या राज्यस्तरीय सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या संगीता गोविंद मेण यांना प्रतिष्ठेच्या ‘स्त्रीरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजहितासाठी त्यांनी सातत्याने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याची राज्यभरातून प्रशंसा होत आहे.
संगीता मेण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरांचे आयोजन, पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती मोहीम, वृक्षारोपण व रोपवाटप उपक्रम, गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात, तसेच सर्वसामान्यांसाठी निःशुल्क योग प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः एकल पालक महिलांसाठी आयोजित केलेला हळदीकुंकू सोहळा हा सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
पतंजली योग समिती व लोकजागर परिवार या संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर जिल्हा आणि राज्यस्तरावर जाणवत असल्याने यापूर्वीही विविध मान्यवर संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात डॉ. जिगेसर (अभ्यासक, मराठी अभ्यासक मंडळ), डॉ. प्रिया धारूरकर (ज्येष्ठ कवी व साहित्यिक), डॉ. विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, समीक्षक व निवेदक), डॉ. प्रमोद घोरपडे कांतीसुत (कवी व रिसर्च सायंटिस्ट), मा. पूजा शेळके (नागपूर पोलीस उपनिरीक्षक), सुभाष सोनवणे (साहित्यिक व व्याख्याते), तसेच पवन शेळके, सोमेश खेडकर, सुमित्रा सृष्टी लोखंडे आदींची उपस्थिती विशेष ठरली. अनेक कवी, साहित्यिक व रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संगीता मेण यांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, समाजहिताच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पतंजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या वतीने त्यांनी आयोजक टीमचे अभिनंदन करून भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
अमरावती जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या सन्मानामुळे अंजनगाव सुर्जी परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

