नांदगाव खंडेश्वरात नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांचा लोकाभिमुख निर्णय : शपथविधीच्या दिवशीच ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या प्रश्नांना दिली प्राधान्याची ग्वाही

नांदगाव खंडेश्वर : नगर पंचायतच्या इतिहासात प्रथमच थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला नगराध्यक्षा सौ. प्राप्ती मारोटकर यांनी पदभार स्वीकारताच लोकाभिमुख प्रशासनाचा ठोस संदेश दिला. शपथविधीच्या दिवशीच नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष ‘जनता दरबार’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल ४८७ नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी लेखी स्वरूपात नगराध्यक्षा यांच्याकडे सादर केल्या, तर १०७ पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम परवानगीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या जनता दरबारात शहरातील मूलभूत सुविधांशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले. नाले साफसफाई, दैनंदिन स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, पथदिवे, घरकुल योजना आदी समस्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. काही तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले, तर उर्वरित प्रश्न निश्चित कालमर्यादेत सोडविण्याचे आश्वासन नगराध्यक्षा मारोटकर यांनी दिले. भोगवटा धारकांना शासनस्तरावर पाठपुरावा करून जागेचा पट्टा उपलब्ध करून देत आठ-अ नोंदणीसह चार महिन्यांत घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मालकीच्या जागा असलेल्या १०७ लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम परवानगी देताना त्यांच्यावर असलेले पाच हजार रुपयांचे बांधकाम शुल्कही माफ करण्यात आले. या निर्णयामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांच्या पुढाकाराचे स्वागत केले. विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आणि त्यांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष मांडत प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष शेख जमिर, पाणीपुरवठा सभापती वासुदेव लोखंडे, बांधकाम सभापती मो. रियाज, स्वच्छता सभापती सौ. ज्योत्सना धवसे, महिला बालकल्याण सभापती कांता लोमटे, उपसभापती शिला वाडेकर, नगरसेवक मो. साजिद, प्रकाश मरोटकर, आयेशा शेख, रजियाबी, अलमास बी, सौ. प्रांजली गुल्हाने, सौ. प्रिती इखार तसेच मुख्याधिकारी निवृत्ती भालकर व नगर पंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कॅबिनवर सार्वजनिक निधीतून मोठा खर्च केल्याचा आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना सौ. प्राप्ती मारोटकर यांनी स्पष्ट केले की, कॅबिनच्या सजावटीसाठीचा खर्च त्या स्वतः करणार असून याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पूर्वीच दिले आहे. जनता दरबारातच त्यांनी हा खुलासा करत पारदर्शकतेची भूमिका अधोरेखित केली.
पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जनतेशी थेट संवाद साधत प्रशासनाची दारे सर्वांसाठी खुली असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम नांदगाव खंडेश्वरच्या नागरी प्रशासनात नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

