सहयोग बँकेत महिला दिनाचा उत्साह; स्वयंसेविकांचा सन्मान, कार्यवृद्धीसाठी मार्गदर्शन

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथील सहयोग बँकेत दर महिन्याप्रमाणे आयोजित करण्यात येणारी मासिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला विशेष स्वरूप प्राप्त झाले ते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे. उपस्थित महिलांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याने सभागृहात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. समाजजीवनात तसेच विविध उपक्रमांमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या छोटेखानी सन्मानामुळे महिलांमध्ये उत्साह संचारला असून कार्यक्रमाला एक वेगळीच उर्जा लाभली.
यानंतर स्वयंसेविकांची नियमित मासिक बैठक घेण्यात आली. मागील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या पात्र स्वयंसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना उपहार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत प्रोत्साहन देण्यात आले.
बैठकीदरम्यान बँकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः कलेक्शन वाढविण्यासाठी कोणत्या पद्धतीने नियोजन करावे, ग्राहकांशी संवाद कसा वाढवावा तसेच कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते उपाययोजना राबवाव्यात याबाबत स्वयंसेविकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे आगामी काळात बँकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहयोग बँकेचे सदस्य तसेच पतंजली लोकजागर परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. सहयोग बँकेचा एकजुटीने कार्य करणारा समूह भविष्यातही सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

