चिखलदरा तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; मडकी येथे पर्यटन विकासासह जलसंधारणावर भर

अमरावती : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा दर्जा तपासून सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
मडकी (ता. चिखलदरा) येथे जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांची सविस्तर माहिती घेतली. मडकी येथील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. जलसंधारणाची कामे केवळ पाणी साठवण्यापुरती मर्यादित न ठेवता, त्यांचा उपयोग पर्यटन वाढीसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी करावा, जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक रोजगार वाढवता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावेळी मौजे कोहाणा येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या (K.T. Weir) कामाचीही पाहणी करण्यात आली. हे काम तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, सर्व विकासकामे ही नियोजनबद्ध आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असावीत. जलसंधारणाच्या दर्जेदार कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. पाणीटंचाई दूर करण्यासोबतच ही ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास परिसराचा आर्थिक कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

