महत्वाचे

अंजनगाव पालिका उपाध्यक्षांसह १७नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अंजनगाव सुर्जी स्थानिक नगर परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एकही सर्वसाधारण सभा आयोजित केली नसल्याचा आरोप करीत उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे यांच्यासह १७नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे.

नगरपरिषद औद्योगिक नगरी नियम, १९६५ च्या कलम ८१ नुसार नियमितपणे सभा घेणे बंधनकारक असतानादेखील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील महत्त्वाची विकासकामे, साधा नालीवरील रपटा न टाकणे, नागरिकांचे प्रश्न आणि धोरणात्मक निर्णय रखडले असल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर प्रियंका मालठाणे यांच्या नेतृत्वाखाली १७ नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी विनंती अर्ज सादर केला. त्यानुसार, नगर परिषदेच्या नियमानुसार किमान एक सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. दरमहा मात्र, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी सभा बोलावलेली नाही. सभेअभावी नागरी सुविधांसंबंधीचे प्रस्ताव मंजूर होऊ शकलेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून सभा आयोजित करण्याचे अधिकार आहेत. याच आधारावर नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सभा लावण्याची मागणी केली आहे.

 

नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभा होणे गरजेचे आहे. परंतु, जाणीवपूर्वक सभा टाळून विकासकामांना खीळ घातली जात आहे.

– प्रियंका मालठाणे, उपनगराध्यक्ष, नगर परिषद, अंजनगाव सुर्जी

 

नगर परिषदेत सत्ता स्थापन झाली तेव्हापासून दोन सभा झाल्या, तर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तिसरी सभा रद्द करण्यात आली होती. रद्द झालेली तिसरी सभा सात-आठ दिवसांत होणार आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रश्न या सभेच्या माध्यमातून सुटणार आहेत.

अविनाश गायगोले, नगराध्यक्ष

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.