जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘फोर के फोटोग्राफर ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम; वृद्धाश्रमात सुरुची भोजन व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

अमरावती / प्रतिनिधी: जागतिक छायाचित्र दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधून ‘फोर के फोटोग्राफर ग्रुप’च्या वतीने सामाजिक भान जपत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विसावा वृद्धाश्रमातील वृद्धांना सुरुची भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली, तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व केक कापून उत्साहपूर्ण वातावरणात छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंदी व उत्साही वातावरणात केक कटिंग करून सर्व छायाचित्रकारांनी एकमेकांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आनंद स्टुडिओचे संचालक देवानंद इंगळे यांच्या कन्येने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९७% गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवल्याबद्दल ग्रुपच्या वतीने तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक दायित्व जपण्याच्या उद्देशाने ‘फोर के फोटोग्राफर ग्रुप’च्या सदस्यांनी विसावा वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील सर्व वृद्ध ज्येष्ठांना आपुलकीने व आदराने सुरुची भोजन देण्यात आले. फोटोग्राफर ग्रुपच्या या उपक्रमाचे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसह सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी आणि सोहळ्यासाठी शैलेश सोनेकर, विनोद मरधडे, विक्की वानखडे, दीप पखाले, मनीष डोंगरे, प्रमोद खंडारे, भैया कांबळे, रविकांत जोसेफ, देवानंद इंगळे, राहुल मोहोड, स्वप्निल मोहोड यांच्यासह परिसरातील बहुसंख्य फोटोग्राफर व छायाचित्र प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

