बेलोरा विमानतळावरून नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘नाईट लँडिंग’ सुविधा
पुणे, तिरुपतीसह पाच शहरांना अमरावतीशी जोडण्याचा प्रस्ताव

अमरावती : एप्रिल २०२५ मध्ये अतिशय दिमाखात सुरू झालेल्या अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या विमानतळावर बहुप्रतीक्षित ‘नाईट लँडिंग’ (रात्रीच्या वेळी विमानांचे उड्डाण व उतरण्याची सुविधा) ही सेवा आगामी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे केवळ विमान सेवा २४ तास उपलब्ध होणार नाही, तर अमरावतीच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी गती मिळणार आहे.
विमानतळाबाबत या महत्त्वपूर्ण टप्प्यासोबतच अमरावतीहून पुणे, तिरुपती, हैदराबाद, सुरत आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी नवीन विमान फेऱ्या सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
बेलोरा विमानतळावर सध्या १८५० मीटरचा सुसज्ज रनवे उपलब्ध आहे. रात्रीच्या विमान प्रवासासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
‘अलायन्स एअर’ला प्रवाशांचा प्रतिसाद १६ एप्रिल २०२५ रोजी ‘अलायन्स एअरलाइन्स’च्या माध्यमातून अमरावती ते मुंबई अशी पहिली विमान सेवा सुरू करण्यात आली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी लक्षात घेता, आता विमान फेऱ्या आणि नवीन शहरांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Deepak Urmil Shiv ka… 18h Replying to Sunil Chaur40355 Sunil, we are in the last stage of completing the PHY infra work of night landing facility at amravati. Work Shouid be over within one month. Then we apply to AAIN DGCA for permissions n that should take 2 months. So by this Nov end, it will be ready
दीपक कपूर यांचे ‘एक्स’वरील द्वीट.
बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरमध्ये डीजीसीएचे पथक पाहणीसाठी येत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सुविधा सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला दिशा मिळेल.
दीपक कपूर, उपाध्यक्ष व एमडी, एमएडीसी.
अमरावती ते पुणे प्रवासासाठी सर्वाधिक मागणी सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावतीहून शिक्षणासाठी, आयटी क्षेत्रासाठी आणि व्यवसायासाठी पुण्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच अमरावती-पुणे विमान सेवेसाठी प्रवाशांकडून सर्वाधिक मागणी केली जात आहे. विमानतळ प्राधिकरणाने पुणे, तिरुपती, हैदराबाद, सुरत आणि अहमदाबाद या पाच शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचा रीतसर प्रस्ताव ‘अलायन्स एअरलाइन्स’कडे पाठवला आहे. या प्रस्तावावर आता अलायन्स एअरलाइन्सकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असून, लवकरच अमरावतीकरांना एकाच वेळी अनेक शहरांशी जोडणारी विमान सेवा मिळण्याची चिन्हे आहेत.
ऑक्टोबरमध्ये ‘डीजीसीए’ची पाहणी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि एअरपोर्टर्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतिम परवानगीनंतर नाईट लैंडिंग सुविधा अधिकृतपणे सुरू होईल. यासाठी ऑक्टोबर महिन्यात ‘डीजीसीए’ची विशेष चमू अमरावती विमानतळाला भेट देणार आहे. यावेळी या चमूकडून धावपट्टी व प्रकाश व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. या पाहणीत चमूने काही सुधारणा सुचवल्यास त्या तात्काळ पूर्ण करून नोव्हेंबर अखेरपर्यंत नाईट लैंडिंगचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

