मारुती चितमपल्लींनी मेळघाटात अनुभवला होता केशराचा पाऊस; भन्नाट किस्सा जाणून घ्या
मेळघाटातील अनेक आठवणी आणि किस्से आजही माझ्यासह अमरावतीकरांच्या स्मरणात आहेत, असं डॉ. मोना चिमोटे यांनी "खरा संवाद" शी बोलताना सांगितलं.

अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून 1990 मध्ये सेवानिवृत्त झालेले मारुती चितमपल्ली यांचं बुधवारी 93व्या वर्षी निधन झालं. 13 वर्षांपूर्वी अमरावतीत ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त मारुती चितमपल्ली आले होते. त्यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली असताना मेळघाटात केशराचा पाऊस अनुभवण्याचा किस्सा त्यांनी सांगितला. त्यांनी सांगितलेल्या मेळघाटातील अनेक आठवणी आणि किस्से आजही माझ्यासह अमरावतीकरांच्या स्मरणात आहेत, असं डॉ. मोना चिमोटे यांनी “खरा संवाद” शी बोलताना सांगितलं.
मामांनी लावला जंगल फिरायचा नाद : सोलापूरला जंगल नसले तरी मारुती चितमपल्ली यांच्या मामांना फिरण्याची आवड होती. त्यांच्यासोबत मारुती चितमपल्ली एखादवेळी जायचे. मामाला जंगलात पांढरा साप पाहायचा होता. या पांढऱ्या सापाच्या नादात मामानं घरदार, शेती सारं काही विकलं. एक दिवस त्यानं चक्क वारूळ फोडलं, त्यात असणाऱ्या काळ्या सापानं त्यांना दंश केला आणि साप चावल्यावर माणूस निळा पडतो, मात्र मामा पांढरा पडला. त्याच्या डोक्यात कायम पांढरा साप असल्यानं तो पांढरा पडला, असा एक किस्सा मारुती चितमपल्ली यांनी सांगितला होता. खरं तर या मामा-मुलाची जंगलात फिरण्याची आवड निर्माण झाली, असं मारुती चितमपल्ली म्हणाले होते, असं डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या.
केशराच्या पावसाचा असा आहे किस्सा : मेळघाटात केशराचा पाऊस पडतो, हा पाऊस मी स्वतः अनुभवला, असं मारुती चितमपल्ली यांनी सांगितलं होतं. मेळघाटच्या जंगलात वाहणाऱ्या नदीकाठी ते एकदा मध्यरात्री बसले होते. अंगावर शाल ओढली होती. पहाटे 2 वाजताच्या सुमारास शालवर केशरी रंगाचा पाऊस पडलेला त्यांना दिसला. हा अनुभव त्यांना थक्क करणारा होता. पिवळ्या फुलांच्या पाकळ्या दिवसा उडून आकाशात जायच्या आणि पहाटे पडणाऱ्या दवांसोबत त्या पुन्हा जमिनीवर यायच्या, हाच तो केशराचा पाऊस मी मेळघाटात अनुभवला, असं मारुती चितमपल्ली यांनी त्यावेळी सांगितलं, तेव्हा जणू ते एखाद्या कवितरलाचं वर्णन करीत आहेत की काय असं वाटायला लागलं. मात्र त्यांनी जे काही सांगितलं ते अगदी खरं होतं, असं डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या.
माकडांच्या शेकोटीचा भन्नाट किस्सा : मारुती चितमपल्ली यांची ती प्रकट मुलाखत जंगल, वन्यप्राणी या आगळ्यावेगळ्या विश्वात काय काय घडतं यासंदर्भातील होती. तसेच कल्पनेपलीकडची नवी माहिती देणारी होती. थंडीच्या दिवसात माकडं शेकोटी करतात हा मारुती चितमपल्ली यांनी सांगितलेला किस्सा तर भन्नाटच होता. माणसांप्रमाणे माकडंदेखील शेकोटी पेटवतात, तशी लाकडं रचून त्याभोवती बसतात. गंमत म्हणजे माणसं ती लाकडं पेटवून शेकोटी करतात. माकडं मात्र केवळ लाकडं रचतात आणि त्यांच्याकडे टक लावून बघतात. त्या लाकडांकडे टक लावून पाहिल्यानं माकडांमध्ये ऊर्जा निर्माण होते. त्या लाकडांमध्ये असणाऱ्या ज्वलनशील तत्त्वाकडे माकडं टक लावून पाहत शोषून घेतात. यानंतर ही लाकडं कधीही पेटत नाहीत, असं एका आदिवासी व्यक्तीनं त्यांना सांगितलं. ही लाकडं मारुती चितमपल्ली यांनी संशोधनासाठी नागपूर विद्यापीठात नेली होती. मात्र ही लाकडं विद्यापीठातून हरवली, असं मारुती चितमपल्ली यांनी सांगितलं होतं. माकडांच्या शेकोटीचा किस्सा कधीही विसरता येणारा नाही, असं डॉ. मोना चिमोटे म्हणल्या.
घुबडाची लोककथा प्रचलित : घुबड हा पक्ष अडीच हेक्टरपर्यंतच्या जमिनीचं संरक्षण करतो, असं घुबड पक्षाच्या अंधश्रद्धेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मारुती चितमपल्ली म्हणाले होते. शेतातील पिकांसाठी नुकसानदायक ठरणारे कीटक, उंदीर यांना घुबड आपलं भक्ष बनवतो. माणसांसाठी महत्त्वाचा असणारा घुबड या पक्षाच्या वाट्याला कोणी जाऊ नये, यासाठी या पक्षाबाबत लोककथा रचण्यात आल्यात, असंदेखील मारुती चितमपल्ली यांनी स्पष्ट केलं होतं, असं डॉ. मोना चिमोटे यांनी सांगितलंय.
चिंचेच्या झाडांचं महत्त्व : गावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगतात. चिंचेच्या झाडात विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते. पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत, जोपासावीत. वादळ – वाऱ्यात विजा कडाडल्यात तर चिंचेखाली उभं राहू नये कारण चिंचेचं झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं. हे सारं त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते चकित होऊन जात, असं डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या.
आयुष्यभर जंगलाचं देत राहिले देणं : मराठी वाचकांना हिरव्या वाटेनं राना-वनात नेणारे मारुती चितमपल्ली अनंताच्या वाटेवर निघून गेलेत. पाखरा-प्राण्यांचं भावविश्व त्यांनी सामान्यांना उलगडून दाखविलं. वृक्ष-वेलींचं अपार महत्त्व त्यांनी रेखाटलं. आयुष्यभर ‘जंगलाचं देणं’ ते देत राहिलेत, अशा शब्दात डॉ. मोना चिमोटे यांनी मारुती चितमपल्ली यांच्याबाबत “खरा संवाद”शी बोलताना आदरांजली वाहिली.

