ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होणार सहभागी : सुप्रिया सुळे
मराठी भाषेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात शरद पवारांचा पक्ष सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

नागपूर : “भाषेचं शिक्षण केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ज्ञ यांचे विचार जाणून घेणं अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणं योग्य ठरणार नाही,” असं मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. मुंबईत होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात शरद पवार यांचा पक्ष सहभागी होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितंलं.
शरद पवार यांचा पक्ष मोर्चात होणार सहभागी : “शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठीच्या संदर्भात 5 जुलै रोजी आयोजित मोर्चामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून ‘कोण’ मोर्चात सहभागी होणार आहे, हे आज किंवा उद्या स्पष्ट केलं जाईल,” असंही त्या म्हणाल्या. “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आमच्यासमोर सर्व लोकांच्या भावना ऐकून घेण्याची जबाबदारी असते. हीच लोकप्रतिनिधीची खरी ताकद आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
समिती निर्णय घेत नाही : “भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अत्यंत महत्त्वाचा सामाजिक व शैक्षणिक विषय आहे. भाषेसंदर्भात जे जाणकार आणि तज्ज्ञ आहेत, त्यांचं मत, माहिती आणि विचार जाणून घेणं आवश्यक आहे. केवळ राजकारण म्हणून विषय हाताळणं योग्य नाही. माशेलकर आणि सुखदेव थोरात यांच्या समितीनं निर्णय घेतला होता, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. मी विनम्रपणे देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छिते की, सत्तेत आणि प्रशासनात काम करण्याचा त्यांना माझ्यापेक्षा अधिक अनुभव आहे. या प्रकारच्या समित्या निर्णय घेण्यासाठी नसतात, त्या शिफारसी देण्यासाठी असतात. मी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या समितीवर आहे, पण आमचं सांगणं म्हणजे निर्णय नसतो, आम्ही फक्त माहिती घेतो.”
आपलं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार : “आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे. कोणताही निर्णय अंतिम नसतो. अनेक वेळा चर्चा होते, देवाणघेवाण होते. मी पुन्हा सांगते, हा विषय खूप गंभीर आहे. ‘त्यांचं सरकार की आमचं सरकार’असा प्रश्न नाही. शिक्षणसंदर्भात निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस वेळ देत नाहीत : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नाहीत, ही माझी मोठी तक्रार आहे. तेली समाजाच्या प्रश्नांबाबत एक निवेदन माझ्याकडं आलं आहे, त्याच्या संदर्भात मी वेळ मागितली आहे. तसेच, हिंदी भाषेबाबतही त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. शेतीसंदर्भातील कर्जमाफी आणि ‘एक रुपयात कृषी विमा’ या महत्त्वाच्या मुद्यांवरही मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. दरवर्षी संसद अधिवेशनाआधी राज्यातील खासदारांसोबत बैठक होत असते. पण गेल्या दोन वर्षांपासून अशी बैठक झालेली नाही. बैठकीत राज्यातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाते. पत्रकारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी राज्यातील सर्व खासदारांची बैठक आयोजित करावी.”
या चर्चांना अर्थ नाही : जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “कोणी प्रवेश मागितला आहे का, भाजपात जाण्यासाठी? जर कोणीच मागणी केली नसेल, तर त्यावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही.”

