ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

संत नामदेव महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पंढरपूर – संत नामदेव महाराज यांचे कर्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर नेली, रुजवली आणि वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. तसेच वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी तसंच सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या पुण्यभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले.

संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध – शेतकरी तसंच वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून, महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास व संस्कार केंद्रांचे महत्त्व – महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला सरकारने देणगी दोन कोटी रुपयांवरून पाच कोटीपर्यंत वाढवली आहे. मंदिरांना संस्कार केंद्र मानून महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत वारकऱ्यांच्या गरजांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच पांडुरंग आपल्या प्रत्येक वारकऱ्यात आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि धर्मरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले. संत नामदेवांनी भक्तीबरोबरच ज्ञानाचा प्रसार केल्यामुळे त्यांची शिकवण देशभर पसरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संतांचे विचार आणि वारकरी संतपरंपरा हीच महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हेच आपले कर्तव्य असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर नामदेव महाराजाच्या वंशजांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांना पगडी वीणा तसेच सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थांच्या वतीने देण्यात आलेला श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज हा पहिलाच पुरस्कार शिंदे यांना देण्यात आलेला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.