ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण
Trending

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असून नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अशात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यानं त्यांना नदी, नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

चिखलातून वाट काढावी लागते : आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शिक्षणाने त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची अंमलबजावणी पाहिजे तशी होत नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील त्यांच्या मूलभूत समस्या अद्याप सुटल्या नाहीत. इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकल्या शाळकरी विद्यार्थीचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास सुरु आहे. रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना नदी, नाले, ओहळातून आणि चिखलातून वाट काढावी लागते. ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात. काही दिवसापूर्वी याच नदीपात्रातून एका आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तरीही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी ढिम्म असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

समस्या सुटत नाही : आमदार हिरामण खोसकर यांनी भाम आणि भावली धरणाचे जल पूजन केले. मात्र आठ किलो मीटर अंतरावर असलेल्या या वाडीला भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेण्याचे साधे कष्ट सुद्धा घेतले नाही. दोन वर्ष अगोदर रस्ता मंजूर असल्याचं सांगितलं होतं. मात्र रस्ताचं काम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आदिवासी बांधवांना आहे. देशाला स्वातंत्र्य तर मिळालं परंतु अजूनही आदिवासीना त्यांच्या मूलभूत गरजांचे स्वातंत्र्य मिळाले नाही. रस्त्याअभावी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात. वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत नसल्यानं अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळं या आदिवासींच्या नशिबी आलेल्या दुःखद घटना दूर झाल्या पाहिजे. जेणेकरून आदिवासींनाही स्वातंत्र्य असल्याचा अनुभव येईल अशी भावना श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी सीताराम गावंडा यांनी व्यक्त केली.

रुग्णांचे होतात हाल : अनेक वर्षापासून खैरवाडी गावाला आणि आजूबाजूच्या पाड्यांना रस्ता नाही. पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण होते. येथील नदी, नाल्यांना पाणी आल्यानं गावाचा संपर्क तुटतो. रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी झोळीकरून नदी, नाल्याच्या पाण्यातून पायपीट करावी लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येतात. याबाबत स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांनी येथे रस्ता, पूल व्हावा यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, त्याला अद्याप यश आलं नाही. जिल्हाधिकारी तसेच अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली पण अजून समस्या सुटल्या नाहीत असं येथील स्थानिक नागरिक बाळू उघाडे यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.