बेकायदेशीर अॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर होणार कारवाई, परिवहन मंत्र्यांचा इशारा
शासनानं ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडं आकारलं पाहिजे. परंतु काही चालक विना परवाना तसंच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आले.

मुंबई : राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार, अॅप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून गेल्या काही दिवसांत 263 अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 3.88 लाख इतका दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती शुक्रवारी (26 सप्टेंबर) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई : “शासनाच्या निर्णयानुसार अॅप-आधारित वाहनं चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणं तसंच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी 80 टक्के भाडं देणं बंधनकारक असून, प्रवाशांकडून ठरविलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडं आकारता येणार नाही,” असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईत अनेक अॅप-आधारित वाहने प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागानं थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. शासनानं ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडं आकारलं पाहिजे. परंतु काही चालक विना परवाना तसंच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आले. अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलीस ठाणे, सांताक्रूझ पोलीस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
ऑटो-टॅक्सींसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं ठरवलेल्या दरांनुसार…
- ऑटो रिक्षासाठी (मीटरप्रमाणे) पहिल्या टप्प्यासाठी (1.5 किमी) 26 रुपये भाडे.
- काळी-पिवळी टॅक्सी (मीटरप्रमाणे) पहिल्या 1.5 किमीसाठी 31 रुपये भाडे.
यानंतर मीटरनुसार प्रवासाचे दर 20.66 पैसे प्रति आकारले जातील. एसी वाहनांना 10 टक्के अधिक भाडं निश्चित केलं आहे.
महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम 2025 अंतर्गत नवे आदेश : या नियमानुसार राज्यात ई-बाईक आणि इलेक्ट्रिक दुचाकींद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे. दुचाकींसाठी पहिल्या 1.5 किमी प्रवासाचे भाडे 15 रुपये तर नंतर प्रति किमी 10.27 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अॅग्रिगेटर्स पॉलिसी लागू : राज्यात अॅप-आधारित वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनानं ‘अॅग्रिगेटर्स पॉलिसी’ लागू केली आहे. यानुसार परवान्याशिवाय अॅप-आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे.
परिवहन विभागाकडून इशारा स्वरूपात कारवाई : मुंबईत बेकायदेशीर वाहनचालकांनी तातडीनं नियमांचं पालन करावं, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाचं सचिव तथा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी दिला आहे.

