अमरावतीत भाजपा काँग्रेस आमनेसामने; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर फेकलं सोयाबीन
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकलं.

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनिमित्त पदाधिकारी मेळाव्यासाठी अमरावतीत आलेले भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकलं. या प्रकारामुळं पंचवटी चौकात काही वेळ गोंधळ उडाला होता.
काँग्रेसचा निघाला होता मोर्चा : अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं मदत द्यावी या मागणीसाठी अमरावती तालुका काँग्रेसच्या वतीनं तालुका अध्यक्ष अमित गावंडे यांच्या नेतृत्वात पंचवटी चौक येथून मोर्चा निघाला. याचवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा पंचवटी चौक येथे पोहचला. याठिकाणी भाजपाच्या वतीनं रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं स्वागत केल्यावर चव्हाण यांच्या वाहनाचा ताफा पोटे कॉलेजच्या दिशेनं निघाला असता चौकात आलेल्या काँग्रेसच्या मोर्चानं भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या ताफ्यावर सोयाबीन फेकलं. या घटनेमुळं चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसानी काँग्रेस यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळं पंचवटी चौकात बराचवेळ गोंधळाचं वातावरण होतं.
वाहतूक व्यवस्था खोळंबली : पंचवटी चौकातून निघालेला काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमामुळं चौकात वाहतूक व्यवस्था खोळंबली. भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राड्यामुळं बराच वेळ वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता.
शेतकऱ्यांना भरपाई द्या : सध्या राज्यातील विविध भागात पावसाचा हाहाकार सुरू आहे. मराठवाडा, सोलापुरात महापूर आलाय. पावसाच्या या रौद्ररुपामुळं शेतकरी हवालदिल झालाय. हातातोंडाशी आलेलं पिक डोळ्यांसमोर वाहून गेलं. घर-दार, जनावरं, अन्नधान्य वाहून गेलं. आता आपल्या या शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्याचं मोठं आवाहन आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करत काँग्रेसनं अमरावतीत मोर्चा काढला.

