दहिगाव रेचा ते पळसखेड रस्ता वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आमदार लवटे यांच्या मध्यस्थीने तोडगा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा ते पळसखेड जिल्हा परिषद अंतर्गत येणारा पांदन रस्ता कडू नाल्यातील पाण्याच्या पुरामुळे २७ ऑगस्ट रोजी पूर्णतः वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे रखडली, पिके शेतात सडली आणि मोठे आर्थिक नुकसान झाले. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासकीय कार्यालयांत केली, मात्र कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
सतत चार दिवस चाललेल्या या उपोषणामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला. अखेर आमदार गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्ते शेतकरी संजय पंजाबराव पारे व इतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आणि उपोषण मागे घेण्यात आले.
रस्ता वाहून जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे मृदा व जलसंधारण लघुपाटबंधारे विभागाने रस्त्यालगत केलेले नाल्याचे खोलीकरण. त्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने रस्ता खचून गेला होता. या रस्त्याने अनेक शेतकऱ्यांची शेती जोडलेली असल्याने शेतमाल वाहून नेणे अशक्य झाले होते.
या तोडगा प्रक्रियेत आमदार गजानन लवटे यांच्यासह श्रीमती पुष्पा सोळंके मॅडम,माजी जिल्हा उपाध्यक्ष सतीश हाडोळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, अशोक चरपे, कपिल देशमुख, विष्णू सावरकर, प्रशांत भगत, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचवर, राजू आकोटकर, अंकुश खाडे, किशोर वाघमारे, भास्कर शेरकर, महेंद्र भगत, जि.प. बांधकाम अधिकारी, मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

