संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या – संभाजी ब्रिगेडची मागणी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला पुराच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर असून शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली असून अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड अंजनगाव सुर्जी तर्फे आमदार गजानन लवटे आणि तहसीलदार श्रीमती पुष्पाताई सोळंके यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. याशिवाय पूरामुळे मृत झालेल्या गुराढोरांच्या बाजारभावानुसार नुकसानभरपाई, घरांचे झालेले नुकसान, संसारोपयोगी साहित्य व मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या भरपाईसाठीही तातडीचे सहाय्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडने सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
“गेल्या काही आठवड्यांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हातात आलेली पिके पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद खचली आहे. शेतकरी चारही बाजूंनी भयंकर संकटात सापडला असून, पुढील काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने कर्जमाफीसह तातडीची व भरघोस आर्थिक मदत करणे अत्यावश्यक आहे.”
तसेच, सरकारने सध्या इतर लोकप्रिय योजनांवर काही काळ अंकुश ठेवून प्राथमिकता ही फक्त आणि फक्त अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना दिली पाहिजे, अशी मागणीही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
या निवेदनप्रसंगी तालुका अध्यक्ष शरद कडू, प्रदेश प्रवक्ता प्रेमकुमार बोके, शहर अध्यक्ष राजेश शिंगणे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचवर, ज्ञानेश तुरखडे, रमेश सावळे, रामेश्वर पाखरे, सिद्धार्थ सावळे, वृषभ ठाकरे, राहुल उके, डॉ. प्रकाश भदे, निलेश ढगे, रोहित कान्हेरकर, अंकुश खाडे, गजानन टेकाडे, बाळासाहेब हिंगणकर यांच्यासह मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

