ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

‘बोगस मतदरांचे पुरावे निवडणूक आयोगाला देणार’; राज-उद्धव आज निवडणूक आयुक्तांना भेटणार

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले की, निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे.

मुंबई: शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई आणि ठाणे येथे बोगस मतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर ‘जोकरगिरी’ करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन बोगस मतदारांच्या पुराव्यांसह आपली तक्रार सादर करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदार : माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितलं की, मुंबई आणि ठाण्यात बोगस मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदार असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

राऊत म्हणाले, “निवडणुकीत मतं कशी येतात, कशी वाढतात, हे आम्ही आयोगाला दाखवणार आहोत. विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसला, आता महापालिका निवडणुकीत असा फटका बसू नये, यासाठी आम्ही आयोगाला भेटत आहोत.” त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत VVPAT प्रणाली का वापरली जात नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना पक्ष मानत नसल्याचा स्पष्टपणे उल्लेख केला. त्यांनी म्हटलं, “देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कधीच झालं नाही.”

 

मनसे महाविकास आघाडीत येणार का? : राज ठाकरे यांची मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का? असा प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारा. मनसे आणि शिवसेना अनेक मुद्द्यांवर एकत्र आहे. बाकी ज्यांना पाहिजे ते आमच्यासोबत येतील.” सर्वपक्षीय शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

अचानक मतदारसंख्या वाढतेय : खासदार राऊत यांनी पुढे सांगितलं की, “अचानक मतदारसंख्या वाढत आहे, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारणार आहोत.” त्यांनी म्हटलं की, मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसला कोणतीही अडचण नाही. आजच्या भेटीत शिष्टमंडळ बोगस मतदार आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततांबाबत ठोस पुरावे सादर करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.