डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने अंजनगाव सुर्जी शहर त्रस्त; आरोग्य धोक्यात, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

– सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या काही आठवड्यांपासून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. विविध भागांतील रहिवाशांचे सायंकाळ नंतर घराबाहेर बसणे कठीण झाले असून रात्री झोपताना डासांपासून बचाव करणे अवघड जात असल्याचे सांगितले. विशेषतः बालकं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील काही भागांत नाल्यांची स्वच्छता नियमित होत नसल्याने तसेच साचलेले पाणी व ओलसर परिसरामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी रिकामे प्लॉट, बंद गटार, तसेच साचलेले पाणी साठून राहिलेल्या जागा डासांच्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याची स्थानिकांची निरीक्षणे आहेत. या संदर्भात संबंधित विभागाने वेळोवेळी तपासणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या घराजवळ पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे, तसेच आवश्यक ती वैयक्तिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील काही दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी व अशक्तपणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले, मात्र या आजारांचा डासांशी थेट संबंध असल्याबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थानिक नागरिकांनी नगर प्रशासनाने नियमित फॉगिंग मोहीम राबवावी, नाले व गटारे स्वच्छ करावीत, तसेच कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

