पावसाचा फटका, शेतमाल भिजला
सर्वच बाजार समितीत हजारो पोते पाण्यात, हजारो शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या धान्याचे नुकसान

अमरावती : शहरासह जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली. यामध्ये बाजार समितीमधील उघड्यावर असलेले शेतमालाचे हजारो पोते भिजले. यामध्ये शेतकऱ्यांसह खरेदीदारांना फटका बसला. शिवारात सोंगणी केलेल्या तसेच गंजी लावलेल्या सोयाबीनमध्ये पाणी शिरले शिवाय वेचणी राहिलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
कमी दाब्याच्या पट्टयामुळे जिल्ह्यात रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना याबाबत अलर्ट देण्यात आला होता. प्रत्यक्षात दिवाळीच्या चार दिवसात धान्य मार्केट बंद असल्याने शुक्रवारी येथील बाजार समितीत २२,२१९ पोत्यांची बंपर आवक झाली. तर शनिवारी १५४६१ पोत्यांची आवक झाली. यामध्ये १४ ४८४ पोते हे सोयाबीनचे आहेत.
बाजार समितीत हर्रास सुरु झाल्यानंतर एक ते दीडच्या सुमारास संपतात. त्यामुळे दुपारी २.१५ दरम्यान आलेल्या १५ मिनिटांच्या पावसाने एका हजारावर पोते भिजले. यामध्ये सर्वाधिक नुकसान खरेदीदारांचे झाले. शिवाय लिलाव न झालेल्या शेतकऱ्यांचेही काही पोते भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
व्यापाऱ्यांच्या पोत्यांची उचल केव्हा ?
अमरावतीसह बहुतेक बाजार समित्यांच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांची पोते आहे. शेतकऱ्यांना लिलावासाठी आणलेला शेतमाल उघड्यावर ठेवावा लागतो. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेडमधील व्यापाऱ्यांच्या पोत्यांची उचल करण्याची मागणी होत आहे.
दरात घसरण, पावसानेही नुकसान
सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये एकाही शेतमालास हमीभाव मिळत नाही. दिवाळीदरम्यान अडचणीतील शेतकऱ्यांनी रबीच्या तयारीसाठी शेतमाल विक्रीसाठी आणला असता पावसाने नुकसान होत आहे.
कापूस भिजला, प्रतवारीत कमी
यंदा कापसाचा हंगाम लांबल्याने आता सीतादही होत आहे. शेतकऱ्यांजवळ शेतमाल नसल्याने ‘सीसीआय’ची केंद्र सुरु झालेली नाहीत, अशा परिस्थितीत कापूस फुटला व वेचणी राहिलेल्या शेतकऱ्यांना झाडावर कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले. काही भागात सोयाबीनच्या गंजी भिजल्याने शेंगामध्ये कोंब निघण्याची शक्यता आहे.
अचलपूर तालुक्यात कोसळला अवकाळी परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरासह तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी तीनपासून अवकाळी पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. यामुळे बाजारपेठा मंदावल्या.
मेळघाटात अवकाळीची हजेरी, दाट धुके
चिखलदरा/परतवाडा : चिखलदरा पर्यटनस्थळावर शनिवारी सायंकाळी चार वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील तीन दिवसांत दिवाळीची सुटी पाहता, २० हजारांवर पर्यटकांनी भेट दिली. पाऊस येताच दाट धुक्यात पर्यटननगरी हरपली. परतवाडा शहरातसुद्धा दुपारी तीनपासून पावसाने हजेरी लावली. दिवाळीच्या सुटीमध्ये चिखलदरामध्ये तीन दिवसांपासून जवळपास २० हजार पर्यटकांनी भेटी दिल्याची नोंद घेण्यात आली आहे.
चिखलदरा पावसाळ्यात लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरले. दिवाळीच्या सुटीत मोठ्या संख्येने पर्यटक आले. रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद त्यांनी घेतला.

