दिवाळीला ‘हिट अँड रन’; बेधुंद कारचालकाने दुचाकीला उडविले

अमरावती : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री महाकाली माता मंदिरात दर्शनासाठी जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणींना धडक देऊन बेधुंद कारचालकाने तेथून पळ काढला. यात एक तरुणी गंभीर जखमी झाली. तर दुसरीला किरकोळ दुखापत झाली. ‘हिट अँड रन’ची ही धक्कादायक घटना दस्तूरनगर ते कंवरनगर मार्गावरील गझल बारसमोरील रस्त्यावर मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर) रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी एका तरुणीच्या तक्रारीवरून त्या कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. कारचे चाक अंगावरून गेल्यामुळे वैष्णवी विष्णू थोरात (२१, रा. जेवडनगर) ही गंभीर जखमी झाली.
जखमी पायल बुंदेले (२२ रा. सबनिस प्लॉट, अमरावती) हिने राजापेठ ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पायल व तिची मैत्रीण वैष्णवी या दोघी मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मोपेडने फरशी स्टॉप परिसरातून कंवरनगरमार्गे शहरातील श्री महाकाली मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या. यावेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. त्यामुळे वैष्णवी आणि पायल दोघीही कोसळल्या. पायल दुचाकीजवळच पडली, तर वैष्णवी कारच्या धडकेमुळे काही अंतरावर समोर जाऊन रस्त्यावर पडली. त्याचवेळी चालकाने त्याचे वाहन थेट वैष्णवीच्या अंगावरून नेले. अपघात होताच चालक तेथून पसार झाला.
वैष्णवीच्या डोक्याला गंभीर दुखापत
अपघात घडताच पायलने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वैष्णवीकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीला तसेच पायलला रुग्णालयात दाखल केले. कार अंगावरून गेल्याने वैष्णवीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तथा तिला फ्रैक्चरदेखील आले आहेत. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ती संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ते फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. पीआय पुनित कुलट यांनी कारचालकाचा शोध चालविला आहे.
हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कारचालकाचा आम्ही शोध घेत आहोत. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपीच्या अटकेनंतर घटनेची अधिक उकल होईल.
पुनित कुलट, ठाणेदार, राजापेठ
यापूर्वी ‘हिट अँड रन’गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कठोरा नाका परिसरातील संमती कॉलनी येथे ३ मे २०२४ रोजी ‘हिट अँड रन’चा प्रकार घडला होता. किशोरनगर परिसरातील रहिवासी भीमसेन वाहने हे दुचाकीने जात होते. यावेळी एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.

