अंजनगाव सुर्जीत निवडणुकीचा रणसंग्राम पेटला! — 2 डिसेंबरला मतदान, उमेदवारांची लगबग सुरू

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : निवडणुकीची घोषणा होताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे. गल्लोगल्ली चर्चांना ऊत आला असून संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदांसह 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यात अंजनगाव सुर्जीलाही स्थान आहे.
या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबरपासून होणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, तर 25 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.
शहरवासीयांची नजर आता 2 डिसेंबरच्या मतदानावर खिळली आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला पार पडणार आहे.
स्थानिक मुद्दे, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांसाठीच्या सुविधा या निवडणुकीत मुख्य ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचाराची रणनीती आखत असून शहरात पोस्टरबाजी, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींना वेग आला आहे.
शहरात “कोणाचे पारडं जड?” हा प्रश्न सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.

