महाराष्ट्र

जनतेच्या विश्वासघाताला माफी नाही : शिवसेना उपनेते सुधीर सूर्यवंशी यांची रोखठोक भूमिका

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, या घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटातून निवडून आलेल्या सहा नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी आज अंजनगाव सुर्जी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांशी बोलताना सुधीर सूर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या संबंधित सहा नगरसेवकांना कायदेशीर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, पक्षशिस्तीच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल. “शिवसेनेची शिस्त, निष्ठा आणि जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सूर्यवंशी यांनी युवा सेना शहरप्रमुख अक्षय गवळी यांनी केलेल्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिले. अक्षय गवळी हे निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी जो अर्ज सादर केला, त्याची माहिती पक्षाला नव्हती, असा खुलासाही सूर्यवंशी यांनी केला.
स्वीकृत नगरसेवक पदाबाबत बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, निष्ठावंत शिवसैनिक पंकज मोदी यांना हे पद देण्यात आले आहे. मागील निवडणुकीत पंकज मोदी दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यामुळे पक्षाने त्यांना थांबवून ठेवत स्वीकृत नगरसेवक पदासाठी विचार केला होता. या निर्णयामुळे कोणाची नाराजी असेल, तर ती संवादातून दूर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनांबाबत बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, “ज्यांना जनतेने भाजपच्या विरोधात मतदान करून निवडून दिले, त्यांनीच भाजपला पाठिंबा दिला. हा निर्णय का आणि कसा घेतला गेला, हे माझ्यासमोर घडले नाही.” पत्रकारांनी पैशाच्या प्रभावाबाबत प्रश्न उपस्थित केला असता, सूर्यवंशी यांनी सांगितले की, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना राजकीय ओळख दिली, त्या पक्षाशी पाठ फिरवणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पक्ष तिकीट वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूर्यवंशी म्हणाले की, उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाशी असलेली निष्ठा या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातात. मात्र, “अवघ्या एका दिवसात निष्ठा बदलल्याचे पाहून मनाला वेदना झाल्या आहेत. तरीही पक्षाच्या वतीने जी कायदेशीर व संघटनात्मक कारवाई करायची आहे, ती निश्‍चितपणे केली जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.