विचारांची पताका विद्यापीठापर्यंत: प्रा प्रेमकुमार बोके यांच्या निवडीचा अंजनगावात अभिमानसोहळा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : एखाद्या व्यक्तीची निवड ही केवळ पदाची शोभा वाढवणारी नसते, तर त्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारांची, कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची पावती असते. गोंडवाना विद्यापीठाच्या छत्रपती शाहू महाराज अध्यासन समितीवर प्रसिद्ध वक्ते, चिंतनशील विचारवंत आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व प्रा प्रेमकुमार बोके यांची झालेली निवड ही याच अर्थाने अंजनगाव शहरासाठी अभिमानाची व प्रेरणादायी घटना ठरली. या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा हा केवळ अभिनंदनाचा कार्यक्रम न राहता विचार, मूल्ये आणि पुरोगामी जाणिवांचा उत्सव ठरला.
समाजातील परिवर्तनशील शक्तींना बळ देणाऱ्या या कार्यक्रमात प्रा. डॉ. सुशील गावंडे (प्रदेश सरचिटणीस, किसान सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजितदादा पवार गट; अध्यक्ष, दर्यापूर–अंजनगाव विधानसभा; विद्यमान संचालक, दर्यापूर खरेदी विक्री संस्था) यांच्या हस्ते प्रा प्रेमकुमार बोके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात प्रा. डॉ. सुशील गावंडे यांनी म्हटले की, “प्रा प्रेमकुमार बोके हे केवळ प्रभावी वक्ते नाहीत, तर ते समाजमन घडविणारे अभ्यासू लेखक आणि मूल्यनिष्ठ विचारवंत आहेत. सामाजिक समतेचा, कुटुंबसंस्थेतील सुदृढ नात्यांचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा पुरस्कार करणारे त्यांचे विचार आजच्या अस्थिर काळात दिशादर्शक ठरतात. गोंडवाना विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेत त्यांचे स्थान म्हणजे नव्या पिढीला बौद्धिक ऊर्जा देणारा दीपस्तंभच आहे.”
या वेळी उपस्थित मान्यवरांनीही बोके यांच्या निवडीकडे पुरोगामी विचारप्रवाहाला मिळालेली भक्कम चालना म्हणून पाहिले. समाजातील विषमता, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात विचारांची मशाल पेटती ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज अधोरेखित करत, त्यांच्या वैचारिक योगदानामुळे शैक्षणिक क्षेत्र अधिक संवेदनशील व समाजाभिमुख बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सुयोग खाडे (गटनेता, अंजनगाव नगर परिषद) तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बोके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा प्रेमकुमार बोके यांना शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला समता, विवेक आणि प्रबोधनाचा संदेश लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

