रवी राणांच्या हाती सत्तासूत्रे, भाजपसमोर वेगळीच अडचण!
भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, अशा तक्रारी अनेक विरोधक नेत्यांनी केलेल्या असताना अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मात्र उलटेच घडले.

अमरावती: भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, अशा तक्रारी अनेक विरोधक नेत्यांनी केलेल्या असताना अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मात्र उलटेच घडले. भाजपचा विजयरथ रोखण्यात बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने हातभार लावला. त्याचे शल्य भाजपच्या अनेक नेत्यांना आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने भाजपला युवा स्वाभिमान आणि इतर पक्षांची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाजूला सारून इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात सत्तासूत्रे ही रवी राणा यांच्या हाती आल्याने भाजपची कोंडी झाली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ८७ पैकी ४५ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षासाठी नऊ जागा सोडूनही शेवटच्या क्षणी युती तुटली आणि युवा स्वाभिमानने ३४ जागांवर उमेदवार उभे केले. अनेक ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात थेट संघर्ष झाला. त्यामुळे भाजपचे नुकसानच झाले. भाजपने सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी भाजपला या निवडणुकीत १९ टक्केच मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २६.६२ टक्के होते. युवा स्वाभिमान पक्षाने नऊ टक्के मते मिळवली आहेत. या पक्षाचा ‘स्ट्राईक रेट’ भाजपपेक्षा चांगला आहे. युवा स्वाभिमान पक्ष वरचढ ठरल्याने भाजपमधील राणा विरोधक गट अस्वस्थ झाला आहे.
विरोधी गटाचे राजकारण…
भाजपच्या पडझडीसाठी माजी खासदार नवनीत राणा कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपच्या काही पराभूत नगरसेवकांनी करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी नवनीत राणा यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या पाच दिवसांत राणा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना ‘डमी’ ठरवून युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार केला, असा गंभीर आरोप पराभूत नगरसेवकांनी केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे विशेष पथक या नाराज उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेईल, असे स्पष्ट केले. नवनीत राणा या भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार करतानाच्या चित्रफिती आमच्याकडे असल्याचा दावा विरोधी गट करीत आहे. त्यावर नवनीत राणांनीही प्रत्युत्तर दिले आहे. जनतेने योग्य उमेदवारांनाच निवडून दिले आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपामध्येच घोळ झाला, अन्यथा ५० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपमध्ये आता राणा विरोधक आणि राणा समर्थक असे दोन उभे गट पडल्याचे चित्र आहे.

